श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३५८ व्या आग्य्राहून सुटका स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १५, २१ व २२ डिसेंबर या दरम्यान हा स्मृतिदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मंडळाचे संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, समिर रुपदे, मंगेश राव, योगेंद्र भालेराव, अमित दारवटकर, अमोल व्यवहारे, सागर चरवड, सतिश सोरटे, वीरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते. आग्य्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा दुर्ग राजगड येथे मागील ४३ वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. यंदा सोहळ्याचे ४४ वे वर्ष आहे.
सोहळ्यानिमित्त लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळा रविवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता लाल महाल येथे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी श्री कसबा गणपतीची पूजा आरती करून ढोल ताशांच्या गजरात पालखी प्रस्थान होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे भारतीय सल्लागार मिलिंद वेर्लेकर, कॉसमॉस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे, शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतिहास अभ्यासक रायबा नलावडे यांचे व्याख्यान होणार आहे.
शनिवार, दिनांक २१ रोजी दुर्ग राजगडावर सांस्कृतिक कार्यक्रम, स्थिर वादन, मर्दानी खेळ तसेच शिवव्याख्याते विनायक खोत यांचे व्याख्यान होणार आहेत. विविध क्षेत्रातील वक्ते, इतिहासकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. रविवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी सूर्योदयाला सकाळी ६ वाजता वंशपरंपरेने किल्लेदार असणारे सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि पद्मावती देवीचे पूजन होणार आहे. सकाळी ९.३० वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात पाली दरवाजा- सदर आणि पद्मावती देवीचे मंदिर असा निघणार आहे. अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी शिवप्रेमींनी संपूर्ण सोहळ्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.