बारामती -विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेला राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. तसेच मतदारसंघाचा दौरा देखील ते करणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेले टिकेवरुन त्यांनी अजित पवार गटाला सुनावले आहे. महायुतीतील भाग असून देखील शरद पवार यांच्या बद्दल असे वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आक्षेप का घेत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या संदर्भात युगेंद्र पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणखी काही अपेक्षित देखील नाही. ते कायमच काहीतरी बोलत असतात. आमच्यासाठी ते नाही नवीन नाही. मात्र आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा भाग आहे. यावर अजित पवार गटाने काहीतरी बोलायला हवे. तेथे आक्षेप घ्यायला हवा. अखेर पवार साहेब एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत. आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीबद्दल असे बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तसेच महाराष्ट्राला ते आवडत नसल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी पवार विरुद्ध पवार लढाई झाली होती. यात अजित पवार हे एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यानंतर युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीही त्यांनी सुरु केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपलाच विजय निश्चित होता. मात्र ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे.