भाडेकरूने दिली सुपारी आणि रचला कट
पुणे- सतीश वाघ अपहरण आणि हत्येमागचे गूढ उकलले असून अटक चार आरोपींची नावे पोलिसांनी सांगितली आहेत , पाचवा संशयित मात्र अद्याप फरार असल्याचे पोलीस सांगत आहेत . अवघ्या २/३ दिवसात पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून पवन श्याम कुमार शर्मा वय ३० वर्षे राहणार शांतीनगर, धुळे,नवनाथ अर्जुन गुरसाळे वय ३२ राहणार अनुसया पार्क वाघोली पुणे तसेच अक्षय हरीश जावळकर आणि विकास शिंदे अशा चौघांना अटक केली आहे.
अपहरण करून खून केलेल्या गुन्ह्याची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उकल केली . पोलिसांनी सांगितले कि,’ या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी ओंकार वाघ यांचे वडील, जे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत ते सतीश वाघ यांना दिनांक ९/१२/२०२४ रोजी सकाळी ०६/०० वा.चे दरम्यान मॉर्निंग वॉकला गेलेले असता अज्ञात इसमांनी शेवरले कंपनीच्या एन्जॉय या मोटार कार मधून अपहरण करून जिवानिशी ठार मारून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला यावरून वरील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा तपास करता गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकेशन प्राप्त करून गुन्ह्यातील संशयित इसम नामे १. पवन श्याम कुमार शर्मा वय ३० वर्षे राहणार शांतीनगर, धुळे. २.नवनाथ अर्जुन गुरसाळे वय ३२ राहणार अनुसया पार्क वाघोली पुणे यांना वाघोली पुणे या परिसरातून चौकशीकामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की मयत यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा इसम नामे अक्षय हरीश जावळकर यांचे व मयत यांचे वैमनस्याचे संबंध होते व त्या दोघांमध्ये वितुष्ट होते. या कारणावरून अक्षय जवळकर यांनी मागील चार ते पाच महिन्यापूर्वी मयत यास जीवे ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा आरोपी क्र ०१ याला दिलेली होती तेव्हापासून आम्ही त्याचे मागावर होतो मागील चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा याने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे विकास शिंदे यांचे सह एक संशयित यांनी मिळून संगणमताने कट रचला तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून अॅडव्हान्स देखील स्वीकारले. ठरल्याप्रमाणे आठ तारखेला पुन्हा एकदा प्लॅन करून सकाळी नऊ तारखेला मयत मॉर्निंग वॉकला गेले असताना संशयित इसम नामे पवन कुमार शर्मा, नवनाथ गुरसाळे विकास शिंदे व अजुन एक संशयित यांनी त्यांचे अपहरण करून एन्जॉय गाडीच्या डिक्कीत टाकून सासवडच्या दिशेने निघून गेले. मयत यास गाडीत टाकल्यापासून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चाकूने मयत त्यांच्यावर वार करून जीवानिशी ठार मारून त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटामध्ये फेकून दिला अशा कबुली वरून संशयित इसम नामे अक्षय जवळकर यास ताब्यात घेतले असता त्याने मयतासोबत त्याचे वितुष्ट असल्याचे सांगून त्याला जीवे ठार मारण्याची पाच लाख रक्कमेची सुपारी दिल्याची कबुली दिली. तसेच संशयित इसम नामे विकास शिंदे यास आव्हाळवाडी रोड वाघोली येथून ताब्यात घेण्यात आले आहे अधिक चौकशी सुरू आहे.
पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे आदेशावरून सदर दाखल गुन्हा हा गुन्हे शाखेकडे वर्ग केला असुन सदर गुन्ह्यामंध्ये अजुन कोणी आरोपी सामिल आहेत का, तसेच आरोपीतामध्ये पैशांची देवाण-घेवाण कशा पध्दतीने झाली याबाबत तपास करावयाचा असल्याने दाखल गुन्हयाचा पुढील तपास सुदर्शन गायकवाड अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे यांचे कडे देण्यात येत आहे.