पुणे- फेसबूकवरील एका जाहिरात पाहून पुण्यातील सहवास सोसायटी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने पुनर्विवाह करण्यासाठी अर्ज भरला. त्यानंतर त्यास एका महिलेने संपर्क साधून विश्वास संपादित करून जेष्ठ नागरिकास प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले. सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तसेचपोलिस कारवाई करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून 72 हजार रुपये ऑनलाईन घेत फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह 3 आरोपीांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा अशी या आरोपींची नावे आहेत .
याबाबत एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कर्वेनगर भागात सहवास सोसायटी येथे राहण्यास आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक घटस्फोटित असून ते पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी फेसबूकवरील एका जाहिरात नुसार नोंदणी केली होती. चोरट्यांनी त्यांना पुनर्विवाहसाठी एक फाॅर्म पाठविला. फाॅर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. शर्माने सोशल मीडियात अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने बँक खात्यावर तातडीने पैसे भरण्यास सांगितले.आरोपी शर्माचा साथीदार विक्रम राठोडने त्यांच्याशी संपर्क साधला. दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याची बतावणी करुन त्यांना बळजबरीने धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली. त्याचा साथीदार राहुल शर्माने त्यांच्याशी संपर्क साधला. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांना बँक खात्यात 72 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकने त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता रोकडे पुढील तपास करत आहेत.