मारकडवाडी-राज्यातील मारकडवाडी गावातून महाविकास आघाडी फेक नरेटीव्ह पसरवत असल्याचा आरोप महायुतीच्या वतीने करण्यात आला आहे. या विरोधात आता महायुती देखील मैदानात उतरली आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीमध्ये मारकडवाडी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत महाविकास आघाडीच्या वतीने फेक नरेटीव्ह पसरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपेने केला आहे.
शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी पडळकर यांनी शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला. शरद पवारांनी मुद्दाम मारकडवाडी हे गाव आंदोलनासाठी निवडले असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. या मतदारसंघांमध्ये शंभर गाव आहेत. मात्र, केवळ धनगर समाज लोकशाही मानत नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच शरद पवार यांनी हे गाव निवडले असल्याचे पडळक यांनी म्हटले आहे.महायुतीच्या वतीने आयोजित या सभेला सर्वसामान्य नागरिकांनी येऊ नये, यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांचे गुंड ठिकठिकाणी उभे केले असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. निवडणुकीत देखील मोहिते पाटील यांनी गुंडगिरीचा वापर केला असल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. मात्र, येथे मारकडवाडी गावातील नागरिक उपस्थित आहेत. ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात. रनजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडून गावागावात पैसे वाटण्यात आल्याचा आरोप देखील सातपुते यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या गुंडांनी धमक्या दिला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गुंडांच्या विरोधात लढणाऱ्या सोनाली शिरतोडे या भाजपच्या कार्यकर्ता असलेल्या महिलेचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मारकडवाडी गावाने येथील ग्रामस्थांनी एक इतिहास रचला आहे. त्यामुळे देशभरात मारकडवाडी गावाचे नाव झाले असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मारकडवाडी गावाला दंडवत करण्यासाठीच आपण येथे आलो असल्याचे खोत यांनी म्हणाले आहे. या वेळी इंद्रजीत भालेराव यांची कविता देखील त्यांनी म्हणून दाखवली. मारकडवाडी गाव भाग्यवान असल्याचे खोत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधीचा शपथविधी आणि लग्नही येथेच करा
भारतातला सगळ्यात मोठा चोर राहुल बाबा देखील तुमच्या गावात येणार आहे. मात्र ते येण्याआधची बोर्ड लावून ठेवा, त्यात ‘कसा गावाकडे आला रे माझ्या दोस्ता’ असा प्रश्न त्यांना विचारा. राहुल बाबा हे अमेरिका, जपान, रशियाला जातात. मात्र त्यांना या इंडियामध्ये देखील भारत नावाचा देश आहे आणि येथे साधी माणसे दगड- मातेची घरात राहतात, हे त्यांना माहितीच नसल्याचे खोत यांनी म्हटले आहे. ‘मेरी शादी कब होगी, मै प्रधानमंत्री बनूंगा तब होगी’ असे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी आणि त्यांचे लग्न देखील मारकडवाडी गावातच लावा, असा टोला देखील खोत त्यांनी लगावला.

