मुंबई-भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी प्रसाद लाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याची मागणी प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने बोलताना आठवले आणि गडकरी यांच्याशी संबधीत ठिकाणांचा उल्लेख केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मनिष निकोसे नामक व्यक्तीने यापूर्वीही प्रसाद लाड यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी होती. त्यावेळी प्रसाद लाड यांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल केल्यानंतरही मनिष निकोसे याने आज पुन्हा प्रसाद लाड यांना फोन करून सुरुवातीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर 2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
तसेच ज्याने प्रसाद लाड यांना धमकी दिली तो आरोपी कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे तर कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा दावा करतो. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून सदर व्यक्तीची कसून चौकशी करावी, त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करावी अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केली आहे. सदरील घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
धमक्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र
दरम्यान, वर्षभरापूर्वी देखील अज्ञात इसमाकडून प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले होते. आपल्या जीवाला धोका असून वारंवार धमकी दिली जात असल्याचे त्या पत्रात म्हटले होते. तसेच एका अनोळखी व्यक्तीकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा देखील प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात केला होता. कामगारांसाठी काम करत असताना आपल्याला अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

