पुणे – काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहात सुंदरबाई मराठी विद्यालयात मुलींसाठी मार्शल आर्ट स्वसंरक्षण शिबीर आज सोमवारी आयोजित करण्यात आले होते. त्यात ४५० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.
या शिबीरात दाई-ईची मार्शल आर्ट अकादमीच्या वतीने कराटे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे आयोजक, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शिबीराचे संयोजक, विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस संकेत गलांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी, शिक्षक सुनील वळसे, योगेश साकोरे, प्रतिक झुरूंगे, अमित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बदलापूर येथील घटनेमुळे महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातील लाडकी बहिण सुरक्षित करणे महत्त्वाचे झाले. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून कराटे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले, असे मोहन जोशी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.
हल्ली शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी निमित्ताने समाजात वावरताना विद्यार्थीनीना, युवतींना बराच काळ घराबाहेर वावरावे लागते, वावरताना काहीवेळा त्यांना अपप्रवृत्तींचा सामना करावा लागतो. अशावेळी स्वसंरक्षणासाठी, स्वतःच्या बचावासाठी त्यांना कराटे किंवा तत्सम प्रशिक्षण उपयोगी ठरते. त्या भूमिकेतून मार्शल आर्ट प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला, असेही मोहन जोशी यांनी सांगितले.