मुंबई : लाडकी बहीण योजनेबद्दल आदिती तटकरे यांनी म्हटले की, लाभार्थी महिलांच्या अर्जाची योग्य छाननी करण्यात आलीये. आता नव्याने कोणत्याही प्रकारची छाननी सरकारकडून करण्यात येणार नाहीये. नव्याने छाननी करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाहीये.लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पुन्हा छाननी होणार असल्याची चर्चा होती. ज्या अर्जांबद्दल तक्रारी आल्या, त्याची छाननी होणार. लाभार्थी नियमानुसार आहेत की नाही याची छाननी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, अशाप्रकारच्या छाननीचा निर्णय सरकारकडून करण्यात आला नाहीये.पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना 2100 रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले आहे. सध्या ज्या महिलांना लाभ मिळत आहे, तो पढील अर्थसंकल्पापर्यंत तसाच मिळत राहणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणून सरसकट सर्वांना १५०० रुपये महिना देण्यात आले. तेव्हा निवडणुका होत्या मते हवी होती म्हणून सरसकट सर्वांना पात्र मानून पैसे दिले गेले. आणि आता बहुमत मिळाल्यावर मात्र अर्जांची छाननी करून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्यात. मात्र अशा प्रकारची कोणतीही छाननी आता होणार नाही . मात्र कोणी कोणाबद्दल तक्रार केली तर तेवढ्यापुरती संबाधीता बद्दलच छाननी होऊ शकते .मात्र अद्याप यावरही सरकारने काही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे सांगितले जाते. हेच नाहीतर निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभारही मानले. आता लाडकी बहीण योजनेवरून मोठे राजकारण रंगताना दिसतंय. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केलीये. संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या अगोदर कोणतीही शहानिशा न करता पंधराशे रूपयांचा व्यवहार मतांसाठी झाला. आणि पंधराशे रूपयांमध्ये बहिणींची मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला. आणि आता मात्र शहानिशा करायची म्हणतात .

