पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात होणार; महाविद्यालयांसोबत वाचनालये, सामाजिक संस्था, संघटना सहभागी होणार
पुणे विमानतळ, मेट्रो, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा थांब्यांवर नागरिक उपक्रमात सहभाग नोंदविणार
पुणे, ०८ डिसेंबर : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत पुणे शहरातील विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या शांतता …पुणेकर वाचत आहे या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, ग्रंथालये, वाचनालये अशा समाजातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. यातच आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक असणाऱ्या पुणे मेट्रो, पुणे विमानतळ, रेल्वेस्थानक, रिक्षा थांबे आणि पीएमपीएमएल थांब्यांवरही हा उपक्रम उत्साहात होणार असून, अनेकजण आपल्या आवडीचे किंवा तेथे उपलब्ध असणारे पुस्तक वाचणार आहे. त्यामुळे या उपक्रमात आपणही सहभागी होऊन, त्याचे छायाचित्र पाठवायचे आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर रंगणार आहे. हा महोत्सव पुणेकरांचा असल्याने, तो घराघरात पोहोचावा यासाठी विविध जाहीर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम ‘ शांतता… पुणेकर वाचत आहे ‘ बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत पुणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी होणार आहे.या उपक्रमात शहरातील प्रत्येकाने या ठरलेल्या वेळेत, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले पुस्तक वाचायचे असून, वाचनासाठी प्रेरणा इतरांनाही द्यायची आहे.या उपक्रमासाठी अनेक पुणेकर आणि संघटना सरसावल्या असून, दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालये, खासगी विद्यापीठे, संशोधन संस्था, सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालयांमध्ये उत्साहात साजरा होणार आहे. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी चौकांमध्ये सामूहिक वाचन करण्याचे उठवले आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली आहे.
पुणे शहरात विमानतळ, मेट्रो स्टेशन, एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानक, पीएमपीएमएल, रिक्षा अशा महत्त्वाच्या वाहतुकीच्या साधनांद्वारे दररोज लाखो नागरिक ये – जा करतात. त्यामुळे या ठिकाणी उपक्रम राबविण्यात येण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक उपक्रमात सहभागी होऊन, त्यांना वाचनाचे महत्त्व कळणार आहे आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी पुण्यातील सरकारी आणि खासगी कार्यालये, आस्थापने यांनी उस्फुर्तपणे आपला उपक्रम नोंदवावा, असे आवाहन पांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
पुणेकर म्हणून काय करता येईल...
- या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, वाचन करतानाचे आपले छायाचित्र आम्हाला https://pbf24.in/register लिंक वर किंवा क्यूआर कोडवर पाठवावे.
- फेसबुक, एक्स, लींकडीन, इंस्टाग्राम अशा समाजमाध्यमावर #पुणेपुस्तकमहोत्सव #PuneBookFestival2024 या हॅशटॅगसह शेअर करावा
- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, कंपन्या आणि विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवावा.
- पुणे शहरातील ग्रंथालये, वाचनालयात या उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडून सहकार्य करावे.

