शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने पुणे कीर्तन महोत्सव : कीर्तन कोविद ह.भ.प. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार
पुणे : सनातन धर्मात केवळ माणसाचेच नव्हे तर प्राणीमात्राचेही कल्याण झाले आहे. सनातन धर्म मनुष्याला मनुष्यत्व प्रदान करतो. मानसिकता दृढ असेल, तर देवधर्माची आवश्यकता भासत नाही, कारण खरे संकट हे मानसिक असते. हे मानसिक विकार बरे करण्यासाठीचे जे शास्त्र आहे, ते सनातन शास्त्र आहे, असे मत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ महाराज यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने प.पू. जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने आणि ह.भ.प किसन महाराज साखरे गौरवार्थ पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन ऐतिहासिक लाल महालात करण्यात आले होते. महोत्सवाच्या समारोपात ह.भ.प. वामनबुवा कोल्हटकर यांना योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते कीर्तन कोविद ह.भ.प. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, ह. भ.प. मंगलमूर्ती औरंगाबादकर उपस्थित होते.
योगी निरंजन नाथ महाराज म्हणाले, कीर्तनकार शाहीर हे देवाचे मुख आहेत. लोकपरंपरा पुढे नेण्यासाठी शाहिरांचा जन्म झाला. आपल्या संस्कृतीची माहिती आपल्यालाच नसते आणि इथे हिंदू लोक कमी पडतात. हिंदू धर्म ग्रंथ संस्कृतीची कोणीही दीक्षा दिली नाही. त्यामुळे आपण परदेशी संस्कृतीच्या मागे लागतो, ही खंत आहे. फेसबुक, व्हॉटसअप पॉडकास्ट चे विद्यार्थी बनू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वामन बुवा कोल्हटकर म्हणाले, कीर्तन ही अशी गोष्ट आहे जी लहान मुलांपासून शंभर वर्षांच्या माणसांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहे. किर्तन हे सगळ्यांना उपयोगी पडते, हेच कीर्तनाचे वैशिष्ट्य आहे. अभ्यासपूर्ण कीर्तन करणारे कीर्तनकार वाढायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अक्षदा इनामदार यांनी आभार मानले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी प्रास्ताविक केले. शिरिष मोहिते यांनी आभार मानले.

