पुणे-पुण्यातील उच्च्भ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगावपार्क, कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा मध्यरात्री उशिरा पर्यंत हाॅटेल सुरू ठेवत धिंगाणा सुरू असल्याचे उघडकीस आले. पुणे पोलिसांचे आदेश धुडकावून हाॅटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत ध्वनीवर्धक सुरू ठेवल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन हाॅटेलच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल केल आहे. कल्याणीनगर येथील कुकू हॉटेलचे मालक खुशबू वर्मा, व्यवस्थापक फैयाज फकीरउद्दीन मीर (वय ३२) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीस कर्मचारी प्रवीण खाटमोडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री कोरेगावपार्क येथील हॉटेल कुकू येथे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये बेकायदा ध्वनीवर्धक सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी हॉटेलमध्ये ४८ ग्राहक होते. पोलिसांनी हॉटेल मालक, व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथील हॉटेल ‘ओ आय ब्रू’ येथे छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी या हाॅटेलमध्ये २५ ते ३० जण ग्राहक तेथे होते. मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवून ध्वनीवर्धक सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक अमन प्रेम तलरेजा (वय ३०, रा. कोरेगाव पार्क), व्यवस्थापक निखिल बेडेकर (वय ३६, मुंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर भागातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर या भागातील मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पबविरुद्ध नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने तेथे कारवाई करून वीसहून अधिक पबविरुद्ध कारवाई केली. मात्र, त्यानंतर या भागातील हॉटेल, पब पुन्हा मध्यरात्रीपर्यंत सुरू झाल्याचे दिसून आले आहे.रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत या भागातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या.

