मुंबई- ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या मारकडवाडी येथे येणार आहेत. माझ्याविरोधात पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटले आहे. उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे.दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत पुढे बोलताना म्हणाले की, मी किमान 40 हजार मतांनी निवडून आलो असतो. मी राजीनामा देणयासाठी तयार आहे, पण बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांनी देखील केली आहे.उत्तम जानकर म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे. ही चिंगारी संपूर्ण देशभर पेटण्याअगोदर निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुनर्मतदानाचा आदेश काढावा. निवडणूक आयोगाने आदेश काढला नाही, तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत आणि त्यातूनही काही नाही झाले तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मारकडवाडीमधून लॉंग मार्च काढणार आहे.
उत्तम जानकर म्हणाले की, पुढील 15 दिवसांत मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन राज्यात आणि देशात जे संशयाचे धुके निर्माण झाले आहे, ते बाजूला करावे असा आमचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देत आहोत. त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे.
उत्तम जानकर म्हणाले की, मारकडवाडीने एक साधा सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला, त्याला जवळपास 18 ते 19 कोटी लोकांनी दाद दिली. भारतातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी त्या घटनेच स्टेट्स ठेवले होते. लोकांमध्ये किती आग आहे, उद्रेक आहे, हे यातून दिसून येते. राज्यात अनेकांनी ईव्हीएमला विरोध केला आहे. मात्र, ती तांत्रिक बाब असल्यामुळे दडपशाहीपुढे ते टिकला नाही. मात्र, त्याचा आता पर्दाफाश होणार आहे.

