मुंबई-काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथून ईव्हीएमविरोधात लाँगमार्च काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधात पडलेली ठिणगी आता देशभर वनवा पेटवेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर सत्तेचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची प्रचंड हाराकिरी झाली. 288 सदस्यीय विधानसभेत महायुतीला 230, तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागा मिळाल्या. या अनपेक्षित निकालामुळे राजकीय पक्षांसह जनतेत ईव्हीएमविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील नागरिकांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी त्यांनी तालुका प्रशासनाकडे गावात मतपत्रिकेद्वारे मतदान चाचणी घेण्याची विनंती केली होती. तसेच त्यासाठी येणारा सर्व खर्च लोकवर्गणीतून देण्याचा निर्णयही कळवला होता. पण प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळली. त्यानंतरही गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्धार केला. पण प्रशासनाने गावात जमावबंदी लागू करून त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
या प्रकरणी उलटसूलट चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मारकडवाडी येथून ईव्हीएमविरोधात लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर याविषयी माहिती देताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने या राज्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे. आयोगाने असे केले नाही तर पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाईल. या प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतः या प्रकरणी मारकडवाडी गावातून ईव्हीएमविरोधात लाँगमार्च काढणार आहेत. ही आग यापुढे देशभर भडकत जाईल. त्यानंतर ती राज्यकर्त्यांना थांबवता येणार नाही.
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात झालेले हे आंदोलन टप्प्याटप्याने तीव्र होत जाईल. पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 3 डिसेंबरपासून स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही ईव्हीएमविरोधात संशय व्यक्त केला आहे.

