रायगड आणि शनिवार वाडा येथील जलकलश रथयात्रेतून नेणार
नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यावतीने भव्य सोहळ्याचे आयोजन
पुणे : नानासाहेब पेशवे यांचा व्दिशताब्दी जन्मसोहळा रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी वेणगाव (कर्जत) येथे संपन्न होणार आहे. या निमित्ताने इतिहास प्रेमी मंडळाने पुणे ते वेणगाव अशी नानासाहेब पेशवे रथयात्रा आयोजित केली असून, त्यामधे रायगड व शनिवारवाडा येथील जलकलश नेण्यात येणार आहेत. रविवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एसएसपीएमएस (श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन रथयात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
नानासाहेब पेशवे यांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळच्या वेणगाव येथे झाला. त्यानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चाणक्य मंडळाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांचे प्रमुख भाषण होणार असून खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे व प्रशांत ठाकूर, पेशव्यांचे वारसदार पुष्कर पेशवे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपस्थित राहणार आहेत. समारंभस्थळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शस्त्र व क्रांतिकारक छायाचित्रे प्रदर्शन आयोजित केले आहे.
मोहन शेटे म्हणाले, भारताच्या इतिहासात इंग्रजी साम्राज्या विरुद्ध भारतीयांनी १५० वर्ष केलेला स्वातंत्र्य संग्राम हे अभिमानास्पद पर्व आहे. त्यामध्ये १८५७ च्या स्वातंत्र्य समराला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण भारतात एकाचवेळी विविध समाज घटकांनी उठाव करणे ही अभूतपूर्व घटना होती. त्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, रंगो बापुजी गुप्ते अशा अनेकांनी नेतृत्व केले. मात्र या अखिल भारतीय संग्रामाचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा होता तो नानासाहेब पेशवे यांचा. त्यांची दूरदृष्टी, संघटन कौशल्य,धाडस , अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी व प्रखर राष्ट्रभक्ती या गुणांमुळे हा संग्राम सर्वव्यापी होऊ शकला.