पुणे, दि ६ डिसेंबर: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी त्यांच्या स्मृतिंना उजाळा देऊन विनम्र अभिवादन केले. तसेच विद्यापीठाचे विश्वस्त, कुलगुरू, विविध विभागातील विभाग प्रमुख, डीन, डायरेक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पाअर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी,वरिष्ठ साहित्यीक आचार्य रतनलाल सोनग्रा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एम.पठाण, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्रा.डॉ. विनोद जाधव, प्रा.डॉ. दत्ता दांडगे व प्रा. गायकवाड उपस्थित होते.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” या देशातील लोकांना भगवान गौतम बुद्ध, म. गांधी आणि डॉ. आंबेडकर कधीच कळला नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यामुळेच आत्मचिंतन किंवा आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. त्यांनी आपल्याला कर्तव्याची जाणिव करून दिली आहे. मानवता हीच भारतीय संस्कृतीचे खरे वलय आहे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले,” अहमदनगरच्या जेलमध्ये जेव्हा मौलाना अबुल कलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य नरेंद्र बंदिस्त होते. त्यावेळेस प्रत्येकाने ग्रंथ लिहिला. परंतू डॉ. आंबेडकर यांनी बाहेर राहून ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ लिहिला. एकाच वेळी देशात सर्वात सुंदर ग्रंथ निर्मिती त्याकाळी झाली होती. यामुळेच आपल्या देशात गुरूग्रंथ असे संबोधिल्या जाते. आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे.”
त्यानंतर डॉ. अशोक जोशी, डॉ.एस.एम.पठाण, डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ.दत्ता दांडगे, प्रा. विनोद जाधव डॉ.मिलिंद पात्रे, प्रा. गायकवाड यांनी भाषणातून सांगितले की, महामानव डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे त्यांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिल्यामुळे आज देश प्रगतीपथावर आहे. डॉ. आंबेडकरांचे तीन गुरू होते भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे होते. प्रत्येकाने आपले मूल्य ठरवून जीवन जगावे अशी बाबासाहेबांच्या शिकवणी ला उजाळा दिला.