पुणे-पाषाण सुस रोड ला एका वाहनाने काही वाहनांना धडक दिल्याचे वृत्त आहे .


सुमारे 6 वाहनांना धडक दिल्या प्रकरणी बाणेर पोलिसांनी संबधित मोटारचालकास ताब्यात घेतले आहे.
ऋत्विक श्याम बनसोडे (वय १९) असे ताब्यात घेतलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. ऋत्विक हा एमजी ग्लॉस्टर मोटार (एमएच-१२ डब्लूएच-९११२) चालवत असताना हा अपघात झाला. त्याच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अविनाश कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक ऋत्विक हा एका व्यक्तीकडे ‘केअरटेकर’ म्हणून कामास आहे.
तो दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी मोटारीतून निघाला होता. त्याने निष्काळजीपणे मोटार चालवून एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने दुसऱ्या वाहनाला धडक दिली.
तेव्हा जमावाने त्याला मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले. परंतु तो बाहेर न आल्याने जमावातील काही तरुणांनी मोटारीवर दगडफेक केली. त्यात मोटारीचे काच फुटल्याने नुकसान झाले. बचावासाठी चालकाने ननावरे चौकातून सूसच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोटार भरधाव नेली. त्याने पुन्हा एका मोटारीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात मोटारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

