मुंबई-महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी झाले. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे पोहोचले होते. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी झाले.शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अर्जुन कपूर, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी, सचिन तेंडुलकर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, अनिल अंबानी, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, बोनी कपूर, श्रद्धा कपूर या सगळ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी पवार यांना 230 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले आहे.शपथविधीसाठी उभे राहताच एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह भाजपनेते अमित शहा यांचेही नाव घेतले. शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने शपथविधी सोहळ्यालासुरुवात –
महत्वाचे म्हणजे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीतासाठी आणि राज्यगीतासाठी संपूर्ण मैदानावर लोक उभे राहिले होते.
एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ –
महत्वाचे म्हणजे, या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तत्पूर्वी, ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? यासंदर्भात राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चाही सुरू होत्या. मात्र अखेर, शिवसेना आमदारांची मागणी मान्य करत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
अजित दादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री –
अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले होते. 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत ते तीन राज्य सरकारांमध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले. महत्वाचे म्हणजे, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा शपथ घेत ते महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, अजित आशाताई अनंतराव पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.


आजच्या शपथविधी कार्यक्रमास मंचावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय सूक्ष्म मध्यम लघू उद्योगमंत्री जितनराम मांझी, केंद्रीय दळणवळण मंत्री जोतिरादित्य सिंधिया, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री मानिक साहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगस्वामी, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यु रिओ, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, केंद्रीय राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, विविध राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वश्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, पवन कल्याण, राजेंद्र शुक्ला, अरुण सावो, विजय शर्मा, प्रेमचंद बैरवा, विजयकुमार सिन्हा, सम्राट चौधरी, कनक बर्धन सिंह देव, प्रवती परिदा, चौना मेन, प्रेसतोन त्यांसोंग, यांथुंगो पटॉन, टी. आर. झेलियांग, एस धार, श्रीमती दिया कुमारी यांच्यासह साधू, संत, महंत, विविध धर्मांचे गुरु, राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, उद्योग, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवर, विशेष निमंत्रित अतिथी उपस्थित होते.
राज ठाकरेंनी दिला पाठींबा –
शपथविधीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं असून, पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा, असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

