मुंबई-
देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतले. शपथविधीपूर्वी फडणवीस यांनी श्रीगणरायाचरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत गिरीश महाजन देखील उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी गोमातेचे पूजन करुन आर्शीवाद घेतले.मुंबादेवी मंदिरातही फडणवीसांनी दर्शन घेतले.

महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर 13 दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन होणार आहे. आज सायंकाळी 5.30 वाजता आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे हेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी होणार आहेत.


