मुंबई-भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना फोन करत शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीत असल्याने ते शपथविधीला येणार नसल्याचे फडणवीसांना कळवल्याची माहिती आहे.भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह एकनाथ शिंदे अन् अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील फोन करुन निमंत्रण दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी होणार आहेत.
दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी फोन करत निमंत्रण दिल्यानंतरही ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे हे शपथविधीला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे हे त्यांच्या व्यैयक्तिक कारणामुळे शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थित राहण्यामागचे कारण समजू शकेल नाही
आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी सांगितले. तसेच सात आणि नऊ डिसेंबर रोजी आमदारांचे शपथविधी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

