मुंबई – पक्ष टिकवायचा असेल तर सत्ता गरजेची आहे या अनुषंगाने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत . शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत.असे शिंदे गटाचे शिरसाठ यांनी म्हटले आहे. मात्र गृह, विधी व न्याय, जलसंधारण, गृहनिर्माण, राजशिष्टाचार, महसूल, दुग्ध व पशुसंवर्धन, वन, सांस्कृतिक, उच्च व तंत्रशिक्षण, ओबीसी, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून), कामगार, ऊर्जा, कौशल विकास, रोजगार या महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने दावा केला आहे. २०१४ मध्ये भाजपचे १२३ आमदार असल्याने त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती. यंदा १३२ आमदार असलेला भाजप अर्थ व नगरविकास सोडली तर मित्रपक्षांना कमी महत्त्वाची खाती देणार आहे.
गृह मंत्रालय मिळाले तरच सरकारमध्ये सामील होऊ, अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत. शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, अशी गळ ते घालत आहेत. गेल्या वेळी शिंदेसेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय हाेते.
आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतील की नाही, हे अनिश्चित हाेते. गृह मंत्रालयावर ते अडून होते, तर भाजप ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही. पण रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा, यासाठी शिंदे सेना व अजित पवार गट आग्रही आहे. पण भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती.

