विधानसभेत भाजपला १३२ तर महायुतीला २३० हून अधिक जागांचे बहुमत मिळूनही १२ दिवस लांबलेल्या मुख्यमंत्री निवडीच्या चर्चेवर बुधवारी पडदा पडला. .निकालापासून १२ दिवस भाजपने मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावांची चाचपणी केली. भाजपमधील फडणवीसविराेधी गटाने मराठा किंवा आेबीसी चेहराच कसा गरजेचा आहे हे भाजप श्रेष्ठींना पटवून देत विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, मुरलीधर माेहोळ यांची नावे चालवली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. भाजपसह मित्रपक्षांतील बहुतांश आमदारांची देवेंद्र यांनाच पसंती होती. त्यामुळे केंद्रीय निरीक्षकांसमोर दुसऱ्या नावाचा पर्यायही आला नाही.केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी व निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता भाजपच्या आमदारांची बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांना गटनेते बनवण्याचा प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात आला. एकनाथ शिंदे व अजित पवारांनीही त्यांना समर्थन दिले. नंतर फडणवीस, शिंदे व पवार यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला
गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती राहिल. या वेळी मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्रीच शपथ घेतील, असे भाजप नेते गिरीश महाजन, अतुल सावे, संजय शिरसाट यांनी सांगितले. पण गृह खात्यावर अडलेल्या शिंदेंनी रात्रीपर्यंतचा वेळ मागितला होता. फडणवीसांनी सलग दुसऱ्या दिवशी शिंदेंशी ५० मिनिटे चर्चा करून मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निर्णय दिला नाही, पण शिरसाट यांच्या मते, शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत.
देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा विरोध असल्याचे चित्र उभे केले होते. मात्र भाजपला सर्वच समाजातून भरघोस मतदान मिळाले, त्यातून हा भ्रम दूर झाला. आता मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या बैठकीत मांडताना सर्व प्रमुख जातींच्या आमदारांना अनुमोदक म्हणून उभे करत फडणवीस हे सर्वमान्य नेतृत्व असल्याचे ठसवण्याचा भाजपने प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. ओबीसी नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला समर्थन देताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त’ अशी देवेंद्र यांना उपमा दिली. रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मेघना बोर्डीकर या मराठा आमदारांनीही अनुमोदन दिले. ओबीसी नेत्यांमधून पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, दलित नेते संजय सावकारे, आदिवासी नेते दिलीप बोरसे व अशोक उईके या आमदारांनीही अनुमोदन दिले. ‘गावगाड्याचे रक्षणकर्ते, बहुजनांचे उद्धारक, गोरगरीब उपेक्षितांचे हृदयसम्राट’ अशी विशेषणे पडळकर यांनी लावली. तर बोरसे यांनी देवेंद्र यांचा उल्लेख ‘आदिवासींचे नेते’ असा केला.
राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील. यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान ५ वर्षे, २०१९ मध्ये ७२ तासांचे मुख्यमंत्री होण्याची नोंद त्यांच्या नावे. मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री होणारे ते एकमेव नेते.
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्या वेळी भाजपचाच व संघभूमीतलाच मुख्यमंत्री हवा असा परिवाराचा आग्रह होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवताना श्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानून देवेंद्र यांनी आपल्या दाव्याचा ‘त्याग’ केला. तसेच इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री हे डिमोशनचे पद स्वीकारून पक्षनेतृत्वाच्या शब्दाचा मान राखला. त्याची बक्षिसी आता देवेंद्र यांना मिळाली. त्यांची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे. भ्रष्टाचाराचे डाग नाहीत, प्रशासनावरही उत्तम पकड आहे.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचे स्वबळावर सरकार होते. म्हणून तिथे नवा चेहरा देता आला. मात्र, महाराष्ट्रात महायुतीत तीन पक्ष आहेत. त्यातही एकनाथ शिंदे व अजित पवार या मुरब्बी नेत्यांवर ‘अंकुश’ ठेवू शकेल असे फडणवीस हे एकमेव नेते भाजपकडे आहेत. त्यामुळे महायुतीचे सरकार चालवण्यासाठी त्यांनाच पसंती देण्यात आली.

