पुणे- व्यवसायासाठी ३० कोटी रुपयांचे कर्ज तात्काळ मंजूर करून देतो असे सांगत, एकाने कन्स्ट्रक्शन व्यावसायिक व्यक्तीची १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राकेश विठ्ठल मारणे (रा. रिजेंट पार्क, बिबवेवाडी) असे आरोपीचे नाव असून, विकास गोपाल कुलकर्णी (६२, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा प्रकार डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यानच्या कालावधीत घडला. आरोपी राकेश मारणे याने विकास कुलकर्णी यांना ३० कोटी रुपयांचे कर्ज त्याच्या आरंभ लक्ष्मी निधी लिमिटेड मधून तात्काळ कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले. तसेच, यासाठी फिर्यादी यांच्याकडून स्टँम्प ड्यूटीसाठी म्हणून १० लाख ५० हजार रुपये तीन टप्प्यात फोन पे व आरटीजीएस द्वारे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यावर वळवून घेतले. यावेळी तक्रारदार यांच्याकडून सिक्युरिटी म्हणून घेतलेल्या एकूण १२ चेक पैकी एक चेक त्याने त्याची आई सुशिला मारणे यांच्या नावाने परस्पर बनवून घेतला. त्याद्वारे तक्रारदार यांच्या बँक खात्यातून २ लाख ३० हजार रूपये काढून घेतले.
यानंतर विकास कुलकर्णी यांना राकेश मारणे याने कर्ज मंजूर करुन देतो असे सांगत आपली १२ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांकडे धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीची चौकशी करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस खाडे करत आहेत.

