: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने पुणे कीर्तन महोत्सव
पुणे : आज माणसाने माणसाला जातीपातीत विभागले आहे. भगवंताने विषमता निर्माण केली नाही. भगवंताने वैविध्य निर्माण केले. परंतु माणसाने विषमता, उच्च-नीच निर्माण केले. या विषमतेत एकता निर्माण करण्याचे सुसंघटित काम संतांनी केले. अनेक हाल अपेष्टा, निंदा त्यांनी सहन केल्या, परंतु ते मागे सरकले नाहीत. मातृभूमीला समर्पित होऊन संतांनी काम केले, असे प्रतिपादन ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे यांनी केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने प.पू. जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने आणि ह.भ.प किसन महाराज साखरे गौरवार्थ पुणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन ऐतिहासिक लाल महालात करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासन प्रमुख डॉ. श्यामा घोणसे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, सेवा मित्र मंडळचे अध्यक्ष पराग शिंदे, ह.भ.प. मंगलमूर्ती औरंगाबादकर उपस्थित होते. महोत्सवाचे यंदा १६ वे वर्ष आहे. कार्यक्रमात आनंद पिंपळकर यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश शाहीरी भवन या वास्तूसाठी देणगी म्हणून सुपूर्द केला.
ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे म्हणाले, मनुष्याकडून देवत्वाकडे जाण्याचा मार्ग अवघड असतो. मोठेपणा स्वस्तात मिळत नाही आणि जर ते मिळाले तर टिकत नाही. झटकन मोठा झालेला माणूस तितक्याच वेगात खाली सुद्धा येतो. परंतु खरे मोठेपण केवळ वर्षानुवर्षे नाही तर युगानुयुगे टिकतो.
आनंद पिंपळकर आणि डॉ. श्यामा घोणसे यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले.

