शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ तर्फे वेद पुरस्कार प्रदान
पुणे: आज वेदाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे; परंतु माध्यंंदिन शाखेतील शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रौतसूत्र यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे . हे दोन्ही ग्रंथ कंठस्थ करण्याची खंंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू व्हायला हवी. पूर्वी वेदांचा अभ्यास आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आर्थिक अडचणी होत्या, परंतु आजच्या काळात वेद अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. वेद विद्येचे संरक्षण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मत ज्येष्ठ वेद अभ्यासक डाॅ. गणेश थिटे यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ यांच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे मंंळा तर्फे वैदिकांना दिल्या जाणार्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे आणि वेदविद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस ,आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी उपस्थित होते.
वेदाचार्य देवेंद्र रामचंद्र गढीकर यांचा योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वेदमूर्ती भगवान त्र्यंबकराव जोशी यांना आदर्श वेद-अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि २५ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमात नारायण ज्ञानोबा बराटे यांना ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात आली तर डॉ. ज्योत्स्ना संजय कुलकर्णी यांना कै. श्रीमती रत्नमाला जोशी यांच्या स्मरणार्थ सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समर्थ काकडे, अद्वैत काकडे, अथर्व दुषी, विराज जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डाॅ. गणेश थिटे म्हणाले, काही वर्षांपूर्वी वेदांचा अभ्यास करण्यासाठी छात्र संख्या खूपच कमी असे . मात्र या वर्षी वेदांच्या परीक्षेसाठी ८०० ते ९०० बसले होते . यावरून वेदाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे असे दिसते. भारतीयांनी वेदांचे जतन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. रवींद्र मुळे म्हणाले, वेदांचे सामर्थ्य मोठे आहे. ज्ञान आणि भक्तीची जीवनात आवश्यकता आहे. ज्ञानाचा निधी असणारे वेद हे भारतीय संस्कृतीचे आधारभूत ग्रंथ आहेत. वेद कंठस्थ करताना परिश्रम घ्यावे लागतात. एकही शब्द मागेपुढे झाला तरी संपूर्ण अभ्यासाला ग्लानी येते . त्यामुळे वेद विद्येचा अभ्यास करणारे आणि वेद कंठस्थ करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा.
अनघा भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत जोशी यांनी आभार मानले.