मुंबई : रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचे आयुष्य गुंतागुंतीचे बनले आहे. यामुळे मनावर येणारा ताणतणाव दूर होणे गरजेचा आहे. म्हणून प्रत्येकाने रोज एक तास तरी ध्यान करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर – साटम यांनी सांताक्रुज येथे आयोजित केलेल्या तेजज्ञान फाउंडेशनच्या रजत महोत्सवी प्रसंगी केले. या कार्यक्रमात मधुरा वेलणकर, तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या, रमा शहा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या यांनी तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा परिचय आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव केली. त्यांनी उपस्थितांना तेजज्ञान फाउंडेशनच्या जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक आहे, असे सांगितले. जीवनात ‘स्वल्पविराम’ घेण्याचे महत्व पटवून देत, “हातातील मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास, ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा, ‘स्व-अनुभव’ येईल,” असे ही त्या म्हणाल्या.
वेलणकर – साटम म्हणाल्या की रोज आपण स्वतःशी संवाद साधला पाहिजे. व्यवसाय, दैनंदिन कामातून वेळ काढत आपण ध्यान देखील करायला हवे. ध्यानासह सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मक विचार न केल्याने त्याचे शरीरावर, मनावर, विचारांवर विपरीत परिणाम होतात. तेजज्ञान फाउंडेशनचे समाजातील कार्य उल्लेखनीय आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की ध्यानामुळे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या व्यक्ती सशक्त होते, त्यामुळे तिच्यात आत्मबळ निर्माण होते. आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला तयार केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. त्यासाठी ध्यान करने निश्चितच महत्वपूर्ण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केले.