इयत्ता दहावीच्या होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्डाचे प्रवेश शुल्क
पुणे: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे या संस्थेच्या माध्यमातून इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्डाचे परीक्षा शुल्क देण्यात आले. कै. संत शिवगंगादेवी बार्शीकर यांच्या स्मरणार्थ श्री संत माई विद्या वृत्ती अंतर्गत शेठ हिरालाल सराफ प्रशालेतील ३२ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क देण्यात आले.
बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत विद्या वृत्ती प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या हस्ते विद्या वृत्ती देण्यात आली. प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रबोधिनीच्या सेवाव्रती नंदिनी देवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार, होनराज मावळे यावेळी उपस्थित होते.
प्रशांत भस्मे म्हणाले, आयुष्यातील पुढची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा महत्त्वाची आहे. अभ्यास करण्यासोबतच विद्यार्थ्यांनी आपले अंगभूत गुण ओळखायला हवेत. अभ्यासाशिवाय अनेक क्षेत्र आज विद्यार्थ्यांसाठी खुली आहेत. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. चांगले यश मिळून समाज आणि देशाची उन्नती करा तसेच अभ्यासासोबतच व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, मुलांच्या उन्नतीसाठी आई-वडील कष्ट करत असतात. मुलांनी शिक्षण घेऊन आयुष्यात खूप मोठे व्हावे, हे स्वप्न ते पाहतात. मुलांनी देखील आयुष्यात यशस्वी होऊन आज जशी मदत त्यांना मिळाली आहे तशीच मदत त्यांनी मोठे झाल्यावर करावी. समाजाचे दिलेले समाजाला परत करायचे आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
नंदिनी देवकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावीचे वर्ष महत्त्वाचे असून त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून स्वतःशीच स्पर्धा करायला हवी.
श्री संत माई विद्या वृत्ती अंतर्गत ३२ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रदान
Date:

