सातारा- राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम करण्यासाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांनी आज दरे गावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गावी जायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी नेहमीच गावी येत असतो,मी गेल्अया बुधवारी माझी भूमिका स्पष्ट केली आहे, बाकी सर्व केवळ चर्चाच आहेत , शहांच्या बरोबर एक बैठक झाली आणि अजून एक बैठक होईल, तेव्हा साधक बाधक चर्चा होईल आणि चांगले लोक हितकारक सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले.
महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय नरेंद्र मोदी, अमित शहा घेतील. मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, यावेळी त्यांना गृहखात्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल तीनदा विचारण्यात आले. मात्र, शिंदे यांनी त्यावर बोलणे टाळले.उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. आमची अमित शहांसोबत एक बैठक झाली आहे. आता तिनही पक्षांच्या नेत्यांची दुसरी बैठक देखील लवकर होणार आहे. त्या बैठकीत चर्चा होऊन महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही जनतेला उत्तरदायित्व आहोत. महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नाही. विरोधकांना काही काम राहिले नाही. त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता होण्याइतके संख्याबळ नाही. झारखंडमध्ये त्यांचा विजय झाला. लोकसभेतही ते जिंकले, मग तेव्हा ईव्हीएम मशीन चांगले होते का? असा सवाल विरोधकांना केला आहे.
लाडक्या बहिणींनी, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने आले आहे. निवडणुकीच्या काळात खूप धावपळ झाली. मी एका दिवसात 8-10 सभा घेतल्या. माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सुटी घेतली नव्हती. धावपळीमुळे थकवा आला होता. त्यामुळे मी आराम करण्यासाठी गावाकडे आलो होतो. गावी आलो की वेगळे समाधान मिळते. आता माझी तब्येत ठीक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.