मुंबई-काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 अंश सेल्सिअसचा ताप आला आहे. यामुळे ते आज दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना घरातच सलाईन लावली आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे महायुती सरकारचा प्रस्तावित शपथविधी सोहळा आणखी लांबतो की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. मात्र शपथविधीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी ते गृह मंत्रालयावर ठाम आहेत. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिंदे मुंबईत परतले आणि सर्व कार्यक्रम रद्द करून साताऱ्याला त्यांच्या गावी रवाना झाले. आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करण्यासाठी साताऱ्याला गेले आहे.
माजी मंत्री दीपक केसरकर हे आज एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी साताऱ्याच्या दरे या त्यांच्या गावी आले होते. पण शिंदेंची प्रकृती ठीक नसल्याचे कळताच त्यांना बंगल्याच्या गेटवरूनच आल्या पावली मुंबईच्या दिशेने माघारी फिरावे लागले.दुसरीकडे, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही 2 दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक आता 1 डिसेंबर ऐवजी 3 डिसेंबर रोजी होईल. याच दिवशी दिल्लीहून 2 पर्यवेक्षक येतील. आमदारांशी चर्चा केल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करतील.त्यातच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, संघाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा. मुंबईच्या आझाद मैदानावर होईल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत शपथ घेईल.