पुणे-EVM हटावो आणि मत मिळविण्याच्या उद्देशाने पैसे वाटप करणाऱ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणण्याच्या प्रवृत्तीविरोधात सुरु केलेले आंदोलन सुरूच राहील मात्र उपोषण ९५ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आज उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत स्थगित केले. तत्पूर्वी अजित पवार , शरद पवार यांनीही बाबा आढाव यांच्या भेटी घेतल्या . आणि आपले मत संसदेत , सभागृहात प्रकर्षाने मांडण्याचे त्यांना आश्वासन दिले .
राज्यातील विधानसभा निवडणुकीत EVM आणि पैशांच्या मोठ्या प्रमाणातील वापराविरोधात त्यांनी आंदोलन, उपोषण केलं होतं. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन पुढे घेऊन जावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित, त्यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली. एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं कोणाला वाटत असेल, तर वणवा पेटवायला एक ठिणकी कारणीभूत असते आणि ती ठिणगी आज पडलेली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे.
तुम्ही म्हातारपण स्वीकारायला तयार नाहीत, आजही तुम्ही आम्हाला प्रेरणा देता. माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी बाबा आढावांबद्दल दिली.पुढे ते म्हणाले, ‘एक सरकारी ताफा आता इथून गेला. महत्त्वाचा मुद्दा हा की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हारलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यात या निकालावर ना हारलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले त्यांना धक्का आहे की आम्ही जिंकलो कसे आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आहे की आम्ही हरलो कसे. याच कारण स्पष्ट आहे. जे आमच्याकडून वदवून घेतलं, सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालं आहे आणि त्याच्याविरोधात आपण उभे राहिलो आहोत’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर तोफ डागली.’आताशी सुरुवात झाली आहे.
पैशांचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावर आलं. सर्वांनी विनोद तावडेंचा तो व्हिडिओही बघितला. योजनांचा पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात या सरकारने काय केलं आहे, की योजनांचा ऍनेस्थेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं.”मह्त्तावाचा मुद्दा एक नाहीये, असे अनेक मुद्दे आहेत. त्यापैकी एक ईव्हीएमचा मुद्दा आहे आणि म्हणूनच मी उल्लेख केला, की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे येतात. याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे’, अशा म्हणत उद्धव ठाकरेंनी EVM घोटाळा मुद्दावर भाष्य केलं.

