पुणे-हनुमान टेकडी, जुना कात्रज बोगदा घाट, तळजाई, सुतारदरा, एआरएआय टेकडी, अरण्येश्वर मंदीर, बाणेर टेकडी, बोलाई माता मंदिर, जोगेश्वर मंदीर, वेताळबाबा टेकडी, चतु:श्रृंगी टेकडी, बोपदेव घाट, पारसी ग्राऊंड, पर्वती, कॅनॉल रोड या टेकड्यांसह अन्य ठिकाणी आणि ब्लॅक स्पॉटवर 600 अत्याधुनिक कॅमेरे बसवणे . त्यात 200 पीटीझेड कॅमेरे, 400 फिक्स कॅमेरे, 100 एएनपीआर कॅमेरे यांचा समावेश करणे आणि एकूणच पुणे शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यासाठी पुणे पोलिस सुमारे 70 कोटींचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच देणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 13 पेक्षा अधिक टेकड्या आणि 7 पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि लाईट्स च्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहे.पुणे शहरातील 13 टेकड्यांचेसह 20 ठिकाणांच्या सुरक्षेसाठी हा प्रस्ताव लवकरच देणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी फेस रिडींग कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. टेकड्यांसह ब्लॅक स्पॉटवर पॅनिक बटण देखील असणार आहे. पॅनिक बटण दाबताच थेट पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला अलर्ट मिळणार आहे. याशिवाय पॅनिक बटण दाबताच त्या परिसरातील अन्य कॅमेरे देखील अलर्ट मोडवर जातील असे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनात देखील पॅनिक बटणचा वापर होताच मोठा आलार्म वाजणार आहे, जेणेकरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लगेचच संबंधित ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे.
यासोबतच या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोलिस पोहोचावे यासाठी ७ विशेष मोबाईल सर्विलन्स व्हेईकल देखील तैनात करण्यात येणारआहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे देखील असणार आहे. यासाठी अंदाजे 70 कोटी रुपये खर्च येणार असून, यामध्ये पाच वर्षांच्या देखभाल दुरूस्तीचा देखील समावेश असणार आहे.तसेच संबंधित ठिकाणी टु वे पीए सिस्टिम (माईक आणि स्पिकर) देखील लावले जाणार आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावे म्हणून 177 पेक्षा अधिक फ्लड लाइट्स देखील लावले जाणार आहेत. सिटी सर्वेलन्सचे बेस्ट फिचर्स यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे अनेक अनधिकृत, अवैध घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.