मुंबई-
मुंबईत आज होणारी महायुतीची एक महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी गेल्यामुळे अमित शहांच्या सूचनेनुसार होणारी ही बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आता 1 डिसेंबर रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यात 2 पक्ष निरिक्षकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजप या प्रकरणी मराठा चेहऱ्यावरही विचार करू शकते. या बैठकीनंतर महायुतीची बैठक बोलावण्यात येणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी अमित शहा यांना सुपूर्द केली आहे. आता शिंदे यांनी भाजपला या यादीवर निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळे ते अचानक गावी गेलेत.
तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी शहांसोबत बंद दाराआड चर्चा केली.सूत्रांच्या मते, अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. शिंदेंनी ही ऑफर स्वीकारून केंद्रात मंत्रिपद स्वीकारले तर शिवसेनेच्या अन्य एखाद्या नेत्याला राज्याचे उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल.