पुणे प्रार्थना समाजाचा वार्षिकोत्सव : संस्थेचे १५५ व्या वर्षात पदार्पण
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस ४ डिसेंबर रोजी १५४ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बुधवार, दिनांक ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष vv, पर्यावरण तज्ञ किरण पुरंदरे, आपलं घर संस्था यांना यंदाच्या वार्षिकोत्सव सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे प्रार्थना समाजाचे खजिनदार प्रशांत पाडवे उपस्थित होते. डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डाॅ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
निसर्ग वेध संस्थेचे संस्थापक किरण पुरंदरे यांना रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरण जतन व संवर्धन तसेच जनमानसात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि पक्षी निरीक्षण या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुरंदरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. समाजातील विविध घटकांसाठी विविध क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ व बहुमोल योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
‘आपलं घर, पुणे’ या संस्थेची डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अनाथ बालकांचे शिक्षण, कौशल्य विकसन, आरोग्य रक्षण यासाठी सुमारे २० वर्षे संस्था कार्यरत आहे. रुपये २५ हजाराचा धनादेश व मानचिन्ह असे तीनही पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता बुधवार पेठेतील हरिमंदिर, पुणे प्रार्थना समाजात दिपोत्सव होणार आहे. तर ७ वाजता ब्रह्मोपासना होणार आहे.
डॉ. दिलीप जोग म्हणाले, शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी ‘युवक मेळा’ कार्यक्रमांतर्गत सायंकाळी ४.३० वाजता ‘प्रार्थना समाजाची ओळख’ या विषयावर इतिहासकार प्रा.डॉ. राजा दीक्षित यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर संगणकतज्ञ योगेंद्र धर्माधिकारी यांचे ‘आपण सारे एक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ.महेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्नेहमेळा असून पुणेकरांनी संस्थेला आवर्जून भेट द्यावी.