‘देवाचे हात’ प्रदर्शनात अद्वितीय मंदिरे व मूर्तींची छायाचित्रे
पुणे : रावण गर्वहरण गणपती, दशभुज लक्ष्मी गणेश, सिद्ध लक्ष्मी महागणपती अशा नानाविध नावांसह २१ मुखी ४२ हातांचा गणपती, १० तोंडे २० हातांचा रावण, १२ हातांचा कार्तिकस्वामी, १० हातांचा मारुती अशा अविस्मरणीय व अद्वितीय मूर्तींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘देवाचे हात’ हा प्रदर्शनात महाराष्ट्रासह कर्नाटक व मध्यप्रदेशमधील ४० हून अधिक मूर्ती व मंदिरांची छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मश्री पं. विजय घाटे, आयोजक प्रभाकर कुंटे आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
कै. मोरेश्वर कुंटे व विजया कुंटे यांनी दुचाकी वरून प्रवास करीत छायाचित्राच्या माध्यमातून संकलित केलेल्या महाराष्ट्रातील १८ हजार मंदिरांपैकी काही अविस्मरणीय व अद्वितीय मंदिरे यानिमित्ताने पुणेकरांना पाहण्याची संधी मिळत आहे. तसेच मूतींमधील विविध वैशिष्ट्ये व माहिती देखील यानिमित्ताने मिळणार आहे.
ठाणे, कोपरागाव, नंदुरबार, वाशीम, परभणी,नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, बीड, धुळे, नाशिक, सोलापूर, रायगड, अमरावती, मुंबई येथील मंदिरे व मूर्तींची छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. विविध ठिकाणच्या मंदिरातील ८ हातांचा कृष्ण, ७ हातांचा अग्निदेव, ४ हातांचा मारुती, ४ हातांचा विठ्ठल व २ हातांच्या गणपतीचे छायाचित्र देखील प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय ‘गाणारे दगड बोलणारे पाषाण’ व पाण्यावर तरंगणाऱ्या विटा देखील ठेवण्यात आल्या आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. ३० नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८. ३० यावेळेत हे प्रदर्शन असून विनामूल्य प्रवेश आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्रभाकर कुंटे यांनी केले आहे.