पुणे, दि. २७: सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये योगदान देता यावे यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करुन दिली असून इच्छुकांना योगदान देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
युद्ध क्षेत्रात किंवा अतिरेकी कारवायांमध्ये शहीद, दिव्यांगत्व आलेले जवान तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियासाठी राज्यशासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांकरीता लागणारा खर्च ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उभारला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे कार्य जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते.
ध्वजदिन निधीमध्ये देण्यात येणाऱ्या देणगी रक्कमेवर आयकर अधिनियम १९६१ कलम ८० जी (५) (६) च्या अंतर्गत आयकर सवलत लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) स. दै. हंगे यांनी दिली आहे.