ईव्हीएममध्ये घोटाळा, बाबा आढावांचा आरोप
पुणे : आज देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत आहे. आता नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. हे करूनही गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह करावा लागेल, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी केली. ईव्हीएमबाबत संशय घेण्यास जागा आहे, असेही त्यांनी नमूद केले.राज्यघटना आणि लोकशाहीची सुरु असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आजपासून 3 दिवस आत्मक्लेश उपोषण सुरु केले आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलंय. बाबा आढाव यांनी वयाची 95 वर्ष पूर्ण केली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे असे मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलं आहे.
ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीलाठी निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो? असा सवाल देखील आढाव यांनी उपस्थित केला आहे. EVM आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली आहे. दरम्यान, मी तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे. त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले.
यावेळी बोलताना बाबा आढाव म्हणाले की, गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे. आदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही. याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले. दरम्यान, आढाव यांचे वय 95 वर्ष आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, वय वाढलं म्हणून काय झालं? असं ते म्हणाले.
लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, की सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितलं पाहिजे असे बाबा आढाव म्हणाले. आज देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरु झालं आहे. रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहे. शेतकऱ्यांचे, तरुणांचे मोठे प्रश्न आहेत. या सर्व गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी आत्मक्लेष उपोषण करणार असल्याचे आढाव म्हणाले. निवडणुकीच्या काळात सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाल्याचे देखील आढाव म्हणाले. याच्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं असल्याचे आढाव म्हणाले.