पुण्यातील विविध शाळांतील बालचमूंचे गीत रामायण सादरीकरण ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन
पुणे : श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः असे म्हणत तब्बल ४०० पुणेकरांसह बालचमूंनी देखील आपल्या भावपूर्ण आवाजात अयोध्या राम मंदिरात रामरक्षा पठण केले. विश्वकल्याणासाठी प्रार्थना करीत रामलल्लाचे डोळ्याचे पारणे फेडणारे रुप पुणेकरांनी डोळ्यात साठवले. रामजन्मभूमीचा इतिहास जाणून घेत प्रभू रामचंद्रांच्या पावन अयोध्येत १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्प पूर्ती एका आगळ्यावेगळ्या सोहळ्यात यावेळी झाली
ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने अयोध्या राम मंदिरात भव्य रामरक्षा पठण आणि गीत रामायण सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे चंपतरायजी, गाेपाळजी, डाॅ.अनिल मिश्रा, तसेच विनीत गाडगीळ, वृंदा जोशी, ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे, नंदकुमार देव,अलका विंझे, ऊर्मिला आपटे व भक्ती सुधा फाऊंडेशनचे आशिष केसकर उपस्थित होते.
वीरेंद्र कुंटे म्हणाले, अयोध्या राम मंदिरात विश्वकल्याण्यासाठी विविध ५ संकल्प करीत विविध शाळांमधील मुलांनी आणि पुणेकरांनी रामरक्षा पठण आणि गीतरामायण सादर केले. राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर,अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याण असे संकल्प उपस्थितांनी केले. गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात मुलांनी गीतरामायण सादर केले.. प्रथमच हिंदी व मराठी भाषेतून गीत रामायण सादरीकरण झाले. हिंदीतून गीत रामायण सादरीकरण करण्यासाठी गोव्यातील दत्तप्रसाद जोग आणि सहकलाकार आले होते.
गोजिरी चित्राव, मिहीर चित्रा, लास्यवी कोंडो (गोळवलकर गुरुजी विद्यालय), अरीयाना नातू (विखे पाटील मेमोरियल स्कूल), अयान पत्की,निखिल दामले, आरुष खानझोडे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल प्रायमरी), मुक्ता विधाते (ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल), राधा धर्माधिकारी, ओम धर्माधिकारी, अरिया संघवी (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल), दिव्या केळकर, वेद अकोलकर (बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), कौमुदी देशपांडे (द स्कूल केएफआय, तामिळनाडू), जिया लोढा (सेंट मेरीज स्कूल), स्पृहा जोशी (वापी पब्लिक स्कूल), देवश्री करमरकर (अहिल्यादेवी हायस्कूल) यांनी गायन केले. सिद्धार्थ कुंभोजकर, मनोहर अत्रे, अदिती केसकर, आशिष केसकर यांनी वादन केले.याचे सुत्र संचालन डॉ प्रचीती सुरू कुलकर्णी यांनी केले.
चितळे बंधू मिठाईवाले, एम. व्ही. टिळे, शालगर होजिअरी, महालक्ष्मी सिल्क, डॉ. प्रशांत सुरु यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य केले.