अभिषेकी बुवांच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न : पंडित हेमंत पेंडसे
पुणे : गायक-संगीतकार म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्थान खूप उच्च आहे. त्यांच्या सांगीतिक संस्कारांचा-शिकवणुकीचा-स्वभावाचा प्रभाव माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर पडला आहे. अभिषेकीबुवांकडून मिळालेले संस्कार प्रवाहित करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे, अशा भावना पंडित हेमंत पेंडसे यांनी व्यक्त केल्या. अभिषेकीबुवांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांसह पंडित पेंडसे यांनी स्वत:ही स्वरबद्ध केलेल्या रचना सादर करून त्यांनी रसिकांसमोर गुरूकृपेचा सांगीतिक ठेवा खुला केला.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत संस्कारात वाढलेल्या प्रसिद्ध गायक संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत रचना आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेल्या रचनांवर आधारित ‘संस्कार यात्रा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांनी प्रभावीपणे रचना सादर केल्या. डॉ. मानसी अरकडी यांनी सुमधूर वाणीत आणि ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. तर यश कोल्हापूरे (सहगायन), अभिजित बारटक्के (तबला) उद्धव गोळे (पखवाज), ऋचा देशपांडे (संवादिनी), तुषार दीक्षित (की-बोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली.
बुवांकडून मिळालेले संस्कार सांगीतिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पंडित अभिषेकी हे अत्यंत प्रेमळ, सर्वांना सामावून घेणारे होते त्याचबरोबर कडक शिस्तीचे आणि वक्तशीरही होते. त्यांनी आपल्या शिष्यांना उत्तम कलाकारच नव्हे तर उत्तम माणूस म्हणून घडविले. माझ्या सांगीतिक रचनांवर बुवांच्या संस्कारांचा प्रभाव आहेच पण संगीतकार म्हणून अभिषेकी बुवांच्या पावलांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पंडित पेंडसे म्हणाले.
संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मीरा बाई यांच्यासह कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, गिरीश, बालकवी, सुधीर मोघे, अशोक परांजपे, डॉ. राहुल देशपांडे आणि रमण रणदिवे यांच्या रचना या वेळी सादर करण्यात आल्या.
अविरत बरसत, गर्द सभोती रान साजणी, राम बरवा, अनंता तुला कोण पाहू शके, व्यथा सांगण्यास ज्ञाना, काळजाला कोण हाका देत आहे, मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले, नाही पुण्याची मोजणी, अंधाराचे धागे वारा विणतो आकाशी, अवघे गर्जे पंढरपूर, संत भार पंढरीत, मै गोविंद आदी गीतांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
मतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असलेल्या सावली ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर निर्मिती पंडित हेमंत पेंडसे यांची होती.