मुंबई-एकीकडे नव निर्वाचित आमदारांच्या शपथविधीची विधिमंडळात तयारी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व 288 नवे आमदार विधिमंडळ परिसरात आमदारकीची शपथ घेतील. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु करण्यात आली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यासाठी भाजप निरीक्षक पाठवणार असून, ते आमदारांचे मत जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविली हा दावा शिंदे समर्थकांचा आहे तर भाजपच्या देवेंद्र समर्थकांचा दावा देवेंद्र यांच्या समर्थ आणि चाणाक्ष नेतृत्वाचा आहे. या दोलायमान स्थितीत शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण होतोय आणि अजित पवार सामंजस्य निर्माण करताहेत अशा बातम्या देखील माध्यमातून येत आहेत .
दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी हा एक डिसेंबर रोजी होणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सरकार स्थापन करण्याची कोणतीच घाई नाही. त्यामुळे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता एक डिसेंबरलाच सरकार अस्थित्त्वात येणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरपर्यंत होता. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नाही. तोपर्यंत शिंदे हेच हंगामी मुख्यमंत्री राहतील. शिंदे 28 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री होते.एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात फडणवीस यांची नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेऊ शकतात.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. आजच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास पूर्वीप्रमाणेच नव्या सरकारमध्येही दोन उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि शिवसेनेकडून शिंदे नव्या आमदाराचे नाव पुढे करू शकतात.