अमेरिकेतही मतदान बॅलेटपेपरद्वारेच होते. एलन मस्क यांनीही EVM छेडछाडबद्दल चिंता व्यक्त केली आहे.भारतातच का EVM लादले जाते? मतदान EVM वर करायचे कि बॅलेटपेपर वर याचे स्वातंत्र्य भारतीयांपासून कोणी का हिरावून घ्यावे ?–-शरद लोणकर (पुणे )
मुंबई-न्यायालये जनतेसाठी आहेत ..त्यांनी जनतेवर EVM लादू नये ..ज्यांचा विश्वास नाही त्यांनी का म्हणून EVM स्वीकारावे ? ज्यांना कागदी मतपत्रिकेवर आपले मत नोंदवायचे आहे त्यांना ते नोंदविता का येऊ नये .. न्यायालयांनी जनतेवर EVM नेच मतदान करा असा आदेश लादू नये अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत असताना त्याबाबतची दखल घेऊनच महाविकास आघाडीने आता ‘मिशन EVM’ सुरु करण्याचे ठरविले आहे आणि त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत .आणि कॉंग्रेसने देखील आता EVM विरोधात आवाज उठविला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष खर्गे स्वतः या EVM विरोधातील मोहिमेत सहभागी होणार आहेत .
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या वतीने यासाठी ईव्हीएम मशीनला दोष देण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून भारतीय जनता पक्षाने हा विजय मिळवला असल्याचा दावा काही नेते करत आहेत. त्यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील ईव्हीएम विरोधात मिशन उघडण्याच्या तयारीत आहेत.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएम संदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी वकिलाची एक फौज उभी करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. या माध्यमातून कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी रोष व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने देखील राज्यभरातील पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत देखील ईव्हीएम मशीनच्या आकडेवारी बद्दल आपापल्या मतदारसंघातून अपडेट माहिती गोळा करण्याचे आदेश पराभूत उमेदवारांना देण्यात आले आहे. आगामी काळात ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यामध्ये जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात आम्ही आजच नाही तर या आधी पासूनच बोलत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड नक्कीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान आजच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. ईव्हीएममधील गडबडीमुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशा मागणीची के.ए. पॉल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? असा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.