महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित शिक्षक कार्यशाळेला प्रतिसाद
पुणे : नेपथ्य आणि प्रकाश योजनेची गरज किती आहे असा प्रश्न आधी संहितेला विचारा. संहितेची मागणी आणि गरज लक्षात घेऊन तांत्रिक बाबींना महत्त्व द्या, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ प्रदीप वैद्य यांनी दिला.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या शिक्षक प्रतिनिधींसाठी आज नेपथ्य आणि प्रकाशयोजना याविषयी द बॉक्स येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी वैद्य यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
वैद्य म्हणाले, काळानुरूप तांत्रिक बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. स्पर्धेतील एकांकिका सादरीकरणाचा निर्धारित वेळ याचा विचार करून नेपथ्य, प्रकाशयोजनेची आखणी करावी. उपलब्ध साहित्याचा उपयोग करून प्रतिकात्मक नेपथ्य साकारावे, प्रकाशयोजना करताना रंगसंगतीचा विचार करावा. विचारांना चालना देण्यासाठी स्पर्धेतील इतर एकांकिकाही आवर्जून बघा असा सल्लाही त्यांनी दिला.
‘भालबा’साठी 37 तर नातू करंडक स्पर्धेसाठी 28 शाळांचा सहभाग
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेत 37 तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत 28 शाळांनी सहभाग घेतला आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 10 ते दि. 12 जानेवारी 2025 तर राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 13 ते दि. 21 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 32वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.