पुणे, ता. २६: ,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून, ती तथागतांच्या धम्मक्रांतीतून आलेली आहेत. सर्वच संत महात्मे आणि समाजसुधारकांनी या मूल्यांच्या प्रस्थापनेवर भर दिल्याने भारत हे विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र बनले हे सत्य असून, त्याला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे,” असे प्रतिपादन लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले.
भारतीय संविधानदिनानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि दर्पण प्रकाशन पुणे यांच्या वतीने आयोजित लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे उद्घाटन पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित संमेलनावेळी स्वागताध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री सुनिता कपाळे, प्रकाशक गुलाबराजा फुलमाळी, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, सौ. पौर्णिमा वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे, कवयित्री शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रसंगी ११४ कवींच्या रचनांचा प्रा. चंद्रकांत वानखेडे संपादित ‘विश्वबंधुतेचा बोधीवृक्ष’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. संमेलनात ११० हुन अधिक कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
प्रकाश रोकडे म्हणाले, “या देशातील नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांमधून या मूल्य विचारांचे शिक्षण दिले जात होते. त्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत होते, हा शाश्वत इतिहास आहे. विश्वबंधुतेचा संदेश देणारा आपला देश आहे. बंधुतेचे हे मूल्य समजून घेत आपण माणूसपणाची भावना वृद्धिंगत करायला हवी. आज जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे, हे आपण आत्मसात करायला हवे.”
डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “आयुष्यात येणाऱ्या अडचणीकडे डोळसपने पाहिले पाहिजे. त्यातून आपल्यातील क्षमता ओळखता येतात. कविता आपल्याला जगण्याची उर्मी देते. भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. त्यामुळे ती केवळ मनोरंजन करणारी नव्हे, तर क्रांती घडवणारी असावी. लेखणी क्रांतीचे प्रतीक आहे. या प्रतिभाशाली लेखणीतून समाज परिवर्तन होणारी काव्य निर्माण व्हावीत.”
प्रा. चंद्रकांत वानखेडे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. संविधानदिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रत्येकाला बंधुतेचे तिरंगी वस्त्र, संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले. शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. गुलाबराजा फुलमाळी यांनी आभार मानले.