पुणे : संवेदनेची समृद्ध भावकविता लिहिणारे मराठीतील ज्येष्ठ कवी हिमांशू कुलकर्णी यांच्या कविता, गझला आणि रुबायांवर आधारित ‘तेव्हाची गोष्ट’ या कार्यक्रमाचे सेतू अभिवाचन मंच, पुणेतर्फे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू रंग-अवकाश यांच्या स्टेज इज युवर्स या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रम सोमवार, दि. 2 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीराम लागू रंग-अवकाश हिराबाग, टिळक रोड येथे होणार आहे. कार्यक्रमाचे संहिता लेखन दीपाली दातार यांनी केले असून दिग्दर्शन अनिरुद्ध दडके यांचे तर संगीत राघवेंद्र जेरे यांचे आहे.
रुबाया, गझला आणि कवितांमधून तरल भावात्म, सामाजिक प्रेम, विरह, चिंतनशील जाणिवा हिमांशू कुलकर्णी यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या गझलमांधून सामाजिक, राजकीय वास्तव आणि सामान्य माणसाचे जगणे यातला अंतर्विरोध समर्थपणे अभिव्यक्त झाला आहे. मराठी मातीचा आणि भारतीय संस्कृतीचा गंध त्यांच्या मुक्तशैलीतील रुबायांमधून अनुभवायला मिळतो. हिमांशू कुलकर्णी यांच्या कविता, गझला आणि रुबयांचे अभिवाचन गीतांजली अविनाश जोशी, अनिरुद्ध दडके आणि दीपाली दातार करणार आहेत. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे आणि कवी हिमांशू कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.