पुणे : राज्यात २८८ मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पाडले. गेल्या ३० वर्षातील सर्वाधिक मतदान यंदा महाराष्ट्रात विधानसभेला झाले आहे. याचा निकाल आता येत्या २३ तारखेला म्हणजे उद्या लागणार आहे. त्याआधी ठिकठिकाणी उमेदवारांचे विजयी बॅनर झळकले आहेत. अशातच पुण्यातील कोथरूड मतदारसंघात महायुतीकडून चंद्रकांतदादा पाटील तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्याआधी एक्झिट पोलनुसार या मतदारंसघात चंद्रकांत दादा पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे विरोधकांना एकच भीती चंद्रकांतदादांना लीड किती ? असा मॅसेज देखील मतदारसंघात आता फिरू लागला आहे.
महायुतीकडून उभे असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी चांगलाच जोर लावल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ ला विद्यमान आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांतदादा पाटलांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ते विजयी होतील की नाही ? याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्यांचा त्यावेळी विजय झाला. आता कोथरूडमधील माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांना केंद्रात संधी मिळाल्याने संपुर्ण भाजप चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी एकवटल्याचे प्रचारात दिसून आले.
सुरूवातीपासून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चंद्रकांतदादा पाटलांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. तर मेधा कुलकर्णी यांनी देखील जोरदार प्रचार केला. त्याचसोबत महायुतीमधील सर्व घटक पक्ष चंद्रकांतदादांच्या प्रचारात सहभागी झालेत. चंद्रकांतदादा पाटील यांनीही मागच्या पाच वर्षात कोथरूडमधील जनतेचा विश्वास सार्थ ठरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक लीड भाजपला कोथरूड मतदारसंघात बघायला मिळेल, अशीही एका बाजूला चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना १००९४१ इतकी मते पडली होती. तर विरोधी उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना ३६, २७९ मते पडली होती. यात मेधा कुलकर्णी जवळपास ६४ हजार ६६२ मतांचा लीड घेऊन विजयी झाल्या होत्या. तर २०१९ साली चंद्रकांतदादा पाटील यांनी जवळपास १०५२४६ टक्के मत घेतली होती. त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा २५, ४९५ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा मताधिक्यांची टक्केवारी वाढेल असा विश्वास व्यक्त केला जाऊ लागला आहे.