पुणे, दि. 14 : “आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा”, असे साकडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मॉडर्न विद्यालयातील विद्यार्थिनींनी भ्रमणध्वनी संदेशाचे माध्यम वापरण्याऐवजी पत्र पाठवून आपल्या पालकांना व नातेवाईकांना घातले आहे.
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून भारत निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व स्विप व्यवस्थापन कक्ष यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न मुलींचे विद्यालय या शाळेतील विद्यार्थिनींनी पालक आणि नातेवाईकांना पत्र लिहीले आहे. निवडणुकीपूर्वीच ते त्यांच्या हातात मिळेल. “आमच्या उज्वल भवितव्यासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी मतदान करा”. असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.
या उपक्रमात 300 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. शालेय अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखन हा विषय आहे. मात्र भ्रमणध्वनीच्या या जमान्यात पत्रलेखन करून आपल्या नातेवाईकांशी हितगुज करणे दुरापस्त झाले असतांना पत्रलेखन करण्याचा अनुभव घेत आपल्या नातलगांना विद्यार्थीनींनी पत्र लिहीले आहे. मतदानापूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या हातात हे टपाल खात्याचे पत्र पोहोचेल, ते सुद्धा याचा सुखद अनुभव घेतील, अशा बेताने हे पत्र टपालाद्वारे पाठविले जाणार आहे. या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ स्वीप समन्वय समितीचे दीपक कदम, सागर काशीद, विशाल म्हेत्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका माया नाईक, डॉ. उज्ज्वला हातागळे, वैशाली घोडके, अनुप्रिती गाजरे, माधवी चिटणीस, जान्हवी दुर्गे, रेश्मा आदमाने, अश्विनी चेन्नूर, श्रुती साठे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.