पुणे, दि. 14 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा या उद्देशाने तृतीयपंथीय आणि बचत गटातील महिलांद्वारे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील रस्त्यावर मानवी साखळी करून लोकशाहीसाठी मताचे दान मागितले.
निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे कमी मतदान झालेल्या भागांमध्ये विशेष मोहीम राबवून उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अनुषंगाने पाटील इस्टेट वसाहत येथे मतदार जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला. तृतीयपंथी आणि बचत गटातील महिलांनी या मोहिमेत सहभाग घेत ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत घरोघरी जात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. पाटील वसाहत येथील पुणे-मुंबई रस्त्यावर मानवी साखळी तयार करून मतदारांचे लक्ष्य वेधत सदृढ लोकशाहीच्या बळकटीसाठी मताचे दान मागून मतदारांना प्रोत्साहित करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमामध्ये समूह संघटिका अलका गुजनाल, तृतीयपंथी आयकॉन शरद खुडे यांच्यासह महिला बचत गटातील प्रतिनिधी तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ स्वीप समन्वय समितीचे दीपक कदम, सागर काशीद, विशाल आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.