पुणे, दि. 14: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे 13 लाख रुपये किंमतीचे विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.3 चे पुणे निरीक्षक देवदत्त पोटे यांनी दिली आहे.
पथकाला 13 नोव्हेंबर रोजी माहितीनुसार बालाजी प्लाजा नगर कल्याण रोड, ओतुर एसटी स्टॅण्ड जवळ,ओतूर ता.जुन्नर येथे विदेशी दारु, वाईन, बिअरचा साठा बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून पथकाच्यावतीने कारवाई केली असता विदेशी मद्दाचे 100 बॉक्स, बिअरचे 125 बॉक्स,वाईनचे 37 बॉक्स असे मिळून एकूण 262 बॉक्स एकूण 13 लाख 20 हजार 420 रुपये किंमतीचा मद्दसाठा जप्त करण्यात आला. मयूर पुरुषोत्तम तांबे याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत भरारी पथक क्र.3 पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय.एम.चव्हाण, पी.ए.ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय साठे, जवान सर्वश्री जगन्नाथ चव्हाण,अमर कांबळे,जयदास दाते,अनिल दांगट व शरद हांडगर सहभागी होते, अवैध मद्य निर्मिती, विक्री वाहतूक तसेच साठवणूकीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोटे यांनी केले आहे.