बीड-उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा आपला पक्ष ‘बटेंगे तो कटेंगे’ या भाजपच्या नाऱ्याचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र हा साधू संतांचा व शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रदेश आहे. त्यामुळे येथे ‘बटेंगे तो कटेंगे’ असले काहीही चालणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही कुणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे ते म्हणालेत.अजित पवार यांची बुधवारी बीडमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘बटेंगे तो कटेंगे’ या भूमिकेशी कोणताही संबंध नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, कुणी काहीही बोलले तरी आम्ही त्याचे समर्थन करत नाही. महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ अजिबात चालणार नाही. ते तिकडे उत्तर भारतात चालेल. महाराष्ट्र हा साधू संतांचा प्रदेश आहे. शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांचीच शिकवण आमच्या रक्तात भिनलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ची हाक दिली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला आहे. या दोन्ही नाऱ्यांमु्ळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असताना अजित पवारांनी त्यापासून स्वतःला व स्वतःच्या पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अजित पवार यांनी यावेळी अल्पसंख्याक समाजाला चुचकारण्याचाही प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने वेगळा निर्णय घेतला. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण असे करून त्यांनी काय मिळवले. शिवसेनेने वक्फ बोर्डाचा विषय आला तेव्हा सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. काय साध्य झाले? ज्यांना तुम्ही मते दिली तेच बहिष्कार टाकून गेले, याचा काहीतरी विचार करा ना. अल्पसंख्याक समाजाने आपल्या विचाराचे कोण आहेत, मदत करणारे कोण आहेत, वेळेवर धावून येणार कोण आहेत, बोलतात तसे वागणारे कोण आहेत याचा विचार करून मतदान केले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्याचा चुकीचा नरेटिव्ह पसरवला. आरक्षण रद्द करण्याची अफवा पसरवली. यामुळे मागासवर्गांची दिशाभूल झाली. अरे पण हे कुणी सांगितले? विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे त्यांनी मनात येईल ते बेछुट आरोप केले. कुणी संविधान बदलले? आम्ही न्यायदेवेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून तिच्या हातात तराजू व संविधान दिले. एवढा संविधानाचा आदर आम्ही करतो. हे चाललंय आमचे.
संविधानाने जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या सर्वांना एकसंध ठेवले आहे. त्यामुळे आपल्या इथे पाकिस्तान व बांगलादेशासारखे उठाव होत नाहीत. जे युक्रेन व रशियात सुरू आहे तसेही आपल्याकडे घडत नाही. शेवटी आपली एक परंपरा आहे. आपली एक संस्कृती आहे. आपल्याला एक इतिहास आहे. या सर्वांचा विसर तुम्ही पडू देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.