ती डॉ. धनंजय शिरोळकर लिखित ‘अनंताख्यान’ ओविबद्ध चरित्रग्रंथाचे प्रकाशन
पुणे : गुरूंप्रती अत्यंत नम्रभाव, श्रद्धा, शरणागती या त्रिगुणातून ‘अनंताख्यान’ अर्थात ‘श्री वरदानंद भारती : कथामृत काव्यबिंदू’ या ओविबद्ध चरित्रग्रंथाची निर्मिती डॉ. धनंजय शिरोळकर यांच्या हातून घडल्याचे जाणवते. हा ग्रंथ परिवारापुरता मर्यादित न राहता जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचे पारायणरूपाने वाचन व्हावे, अशी अपेक्षा श्री राधादामोदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी नामजोशी यांनी व्यक्त केली. अनंताख्यान हे ग्रंथ शिर्षक अत्यंत समर्पक असून या ग्रंथातून प.पू. वरदानंद भारती यांच्या जीवनातील घटनाक्रम सहज-सोप्या आणि आशयघन शब्दांतून ओवीरूपाने समोर आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
प.पू. वरदानंद भारती तथा अनंतराव (अप्पा) आठवले यांच्या तेजाचे चांदणे या आत्मचरित्रपर ग्रंथाच्या ओवीबद्ध अवतर्णिकेची निर्मिती त्यांचे सुशिष्य डॉ. धनंजय शिरोळकर यांनी केली आहे. या ओवीबद्ध चरित्रग्रंथाचे प्रकाशन डॉ. कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रम गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला होता. गोरटे येथील श्री दासगणू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्याणी शिरोळकर, देवव्रत शिरोळकर व्यासपीठावर होते.
डॉ. नामजोशी पुढे म्हणाल्या, ग्रंथातील ओव्यांची मांडणी आकर्षक असून कमीतकमी शब्दात परंतु भक्तीरसाची महती दर्शविणारा भावविलास उत्तम साधला आहे. प.पू. वरदानंद भारती यांना आलेल्या अतींद्रिय अनुभूती रचनाकार डॉ. शिरोळकर यांनी अतिशय निर्भिडपणे सात्विक-निर्मळ मनातून मांडल्या आहेत.
महेश आठवले यांनी प.पू. दासगणु महाराजांचे अनुयायी असलेल्या वडील प.पू. वरदानंद महाराज यांच्या अनेक आठवणी सांगत त्यांच्या स्वभावाचे, विचारांचे पैलू उलगडून दाखविले. हा ग्रंथ म्हणजे प.पू. वरदानंद महाराज यांच्या चरित्राचे रसाळ शब्दातील ओवीबद्ध दर्शन होय, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना डॉ. धनंजय शिरोळकर म्हणाले, प.पू. वरदानंद महाराज यांच्या विचारधनाचे भांडार सर्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांचे सामाजिक योगदान पुढे यावे यासाठी ग्रंथाची निर्मिती केली आहे. देवव्रत शिरोळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार अभय जबडे यांनी मानले.
फोटो ओळ : ‘अनंताख्यान’ अर्थात ‘श्री वरदानंद भारती : कथामृत काव्यबिंदू’ या ओविबद्ध चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) कल्याणी शिरोळकर, महेश आठवले, डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. धनंजय शिरोळकर.