सिद्धार्थ शिरोळे यांच्या दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि. १४ नोव्हेंबर, २०२४ : महाराष्ट्रात होत असणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. सध्या राज्यात सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार राज्यामध्ये सत्तेत येणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी खडकी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे परशुराम वाडेकर, माजी नगरसेविका सुनीता वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडकी बाजार परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरवात झाली. खडकी परिसरात या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सध्या सत्तेमध्ये असणारे महायुतीच्या सरकारने जनहिताची कामे केली आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या प्रेमात आहेत. महाविकास आघाडीवर राज्यातील जनतेचा विश्वास नाही, त्यामुळे निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.
केंद्रात सत्तेमध्ये असणारे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. त्यामुळे राज्यामध्ये महायुतीला मोठा विजय मिळेल. देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा लौकिक मोठा आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. सिद्धार्थ शिरोळे यांनी आमदार म्हणून केलेल्या कामाचे आठवले यांनी यावेळी कौतुक केले.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपण माझ्या प्रचारासाठी इथे आला होतात, तेव्हा मी आमदार म्हणून निवडून आलो होतो. यंदा देखील तुम्ही आलात त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे सांगताना रामदासजी तुम्ही माझ्यासाठी लकी असल्याचे उद्गार सिद्धार्थ शिरोळे यांनी यावेळी काढले.
खडकी छावणी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणात “पुण्यातील शिवाजीनगरचे नागरिक आहेत भोळे, इथे निवडून येणार आहेत सिद्धार्थ शिरोळे’ अशी चारोळी देखील सादर केली.
सिद्धार्थ भाऊ आहे, मित्र आहे, सर्वसामान्याचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे तो आपला आहे, अशी भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.