.घटनेबद्दल प्रेम असेल तर संघपरिवार मनुस्मृती चे दहन का करीत नाही?
निर्भय बनो आंदोलनाच्या सभेला येरवड्यात चांगला प्रतिसाद
पुणे :’योजनांद्वारे पैसे वाटून मत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत,पण पैशासाठी मत द्यायचे की सुरक्षिततेसाठी द्यायचे हा निर्णय घ्यायची वेळ आली आहे’,असे प्रतिपादन निर्भय बनो आंदोलनाचे प्रणेते एड. असीम सरोदे यांनी केले.तर ‘गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा .श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका,असे आवाहन डॉ.विश्वम्भर चौधरी यांनी केले.
निर्भय बनो आंदोलनाच्या वतीने,संविधान प्रचारक चळवळ यांच्या जेसीडी पार्क,मोझे नगर,येरवडा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.एड.असीम शेख,डॉ.विश्वम्भर चौधरी,इब्राहिम खान ,निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड,स्मिता ताई,बाळकृष्ण निढाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मते व्यक्त केली.’अन्यायाविरुद्ध न्यायाच्या लढाईत निर्भय बनो,भारत जोडो’ असा संदेश या सभेने दिला. सभेला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
एड.सरोदे म्हणाले,’ माणुसकी हवी असेल तर महाविकास आघाडीला मतदान केले पाहिजे.महिलांचा आदर असेल तर महिलांच्या प्रकरणात राजकीय फायदा घेण्याचे काम भाजप नेते का करतात ? ते सतत असे करीत आले आहेत.बदलापूर प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात चालढकल का केली गेली.तेथील संस्था संघ ,भाजपशी संबंधित असल्याने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले. राहुल गांधी यांच्या संविधान संबंधी भूमिकेचे जगभर स्वागत झाले आहे. संविधान द्वेष शिकवत नाही,प्रेम शिकवत आहे .संविधान पुस्तकावरून राजकारण करणे हे फडणवीस यांना शोभते का ? त्यांना संविधान कळते का ? हे मनुस्मृती मानणारे लोक आहेत.त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की ते संविधान मानतात का ?
आपण आज सर्व भाजपचे नेते असभ्य बोलताना,वागताना पाहत आहोत.लाथा मारताना पाहत आहोत.आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे ,कारण ते असंवेदशील झाले आहेत.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संघर्ष करण्याचे शिकवले आहे. सभ्य माणसांची लढाई असभ्य माणसांची आहे.अजित पवार यांनी जे केले त्यातून त्यांना यश मिळणार नाही. व्होट जिहाद हा चुकीचा प्रचार आहे . भाजप जर मुस्लिमांशी वाईट वागत असतील तर ते भाजपला का मतदान करतील,हा साधा प्रश्न आहे,असेही एड सरोदे यांनी विचारले.
डॉ.विश्वम्भर चौधरी म्हणाले ,’गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा .श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका. पुण्याची इज्जत कोणी घालवली ? माणुसकीला काळे फासणारी ही घटना आहे.आम्ही पुण्यात यासाठीच सभा घेतली, कारण यांना धडा शिकवला पाहिजे. आपण बिल्डरांचा प्रतिनिधी निवडता कामा नये, सामान्य माणसांचा प्रतिनिधी निवडला पाहिजे.वोट जिहाद म्हणून भाजपचे लोक संविधानाचा अपमान करीत आहेत.शिंदे -फडणवीस यांच्याकडे दाखविण्यासारखे काही नाही.खोके सरकारने महाराष्ट्राचा अपमान केला ,शिवाजी महाराजांची शान घालवली.मानवता धर्म नष्ट केला. पुण्यावर गुंडांच्या टोळ्या राज्य करणार नाहीत याची काळजी आपण केली पाहिजे.
हा देश नथुराम चा असेल कि गांधींचा असेल हा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहणार कि नाही,हा प्रश्न आहे.घटनेबद्दल प्रेम असेल तर संघपरिवार मनुस्मृती चे दहन का करीत नाही,हा प्रश्न आहे. भ्रष्टाचार उखडून सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हाकलले पाहिजे,असे आवाहनही डॉ.चौधरी यांनी केले.